आमच्या दुसऱ्या वर्गातील मित्रांना नवी पुस्तके मिळाली, पण मला एकही पुस्तक मिळाले नाही. आमचा अभ्यास सुरू झाला आहे, आम्ही कोणत्या पुस्तकातून अभ्यास करायचा?, असे प्रश्न आता विद्यार्थी त्यांच्या पालकांना विचारून भंडावून सोडत आहेत.शहरासह तालुक्यात पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना अद्यापर्यत शालेय पुस्तके पूर्ण मिळाली नाहीत. तर दुसरीकडे आठ दिवसांपूर्वी उघडलेल्या शाळांमध्ये अभ्यासक्रम शिकविणे सुरू झाले आहे. मात्र अपूर्ण पुस्तकांमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. तालुक्यात 161 शाळा असून, 35 हजार 559 पुस्तकांची मागणी शासनाकडे केली होती. मात्र, प्रत्यक्षात 29 हजार 263 पुस्तकेच येथे प्राप्त झाली असून सहा हजार 293 पुस्तके कमी आलेली आहेत.एकूणच मागणीपेक्षा कमी पुस्तके मिळाल्याने ही अडचण निर्माण झाली आहे. तिसरी ते सातवीपर्यंतच्या वर्गातील पुस्तके मोठ्या संख्येने अपूर्ण आहेत. त्यामुळे बाजूच्या मित्राला नवे पुस्तके तर आपल्याला पुस्तक का नाही? अशी भावना विद्यार्थ्यांमधून व्यक्त करण्यात येत आहे. शिक्षण विभागाने याविषयी गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा